मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने ८ सरकारी बँकांना तब्बल ११ कोटींचा दंड ठोठावला आहे. नियमाचे उल्लंघन केल्याने आरबीआयने ही कारवाई केली आहे.
आरबीआयने दंड ठोठावण्याचे आदेश ३१ जुलै, २०१९ ला काढले आहेत. चालू खाते (करंट अकाउंट्स) सुरू करणे आणि चालविणे यासाठीच्या नियमांचे बँकांनी उल्लंघन केल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
या बँकांना ठोठावण्यात आला दंड-
अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्राला प्रत्येकी २ कोटींचा दंड ठोठावला आहे. तर बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाला प्रत्येकी १.५ कोटींचा दंड ठोठावला आहे. तर ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्सला १ कोटींचा दंड ठोठावला आहे. कॉर्पोरेशन बँकेला सायबर सुरक्षेतील त्रुटीही भोवली आहे. आरबीआयने कॉर्पोरेशन बँकेला १ कोटींचा दंड ठोठावला आहे.
बँकिग नियमन कायदा १९४९ नुसार आरबीआयला बँकांवर कारवाई करण्याचे आदेश आहेत. या कायद्याच्या आधारे आरबीआयने कारवाई केली आहे. आरबीआयने विविध कंपन्यांच्या खात्यांचे परीक्षण केले. त्यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्याचे आरबीआयला आढळून आले. या आधारे आरबीआयने बँकांना कारणे दाखवाची नोटीस बजावली होती. त्यानंतर बँकांनी दिलेले उत्तर व घेण्यात आलेली वैयक्तिक सुनावणी यांचा विचार करून आरबीआयने कारवाई केली आहे.
सरकारी बँकांवरील कारवाईचा आणि बँकेकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा संबंध नसल्याचेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.