मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने लक्ष्मी विलास बँकेचे दैनंदिन कामकाज चालविण्यासाठी स्वतंत्र तीन संचालकांची समिती नियुक्ती करण्याची परवानगी दिली आहे. ही माहिती बँकेने शेअर बाजाराला दिली आहे.
लक्ष्मी विलास बँकेच्या वार्षिक सभेची सर्वसाधारण बैठक २५ सप्टेंबरला झाली. या बैठकीत सात संचालकांची संचालक मंडळावर पुनर्नियुक्ती करण्याला बँकेच्या समभागधारकांनी विरोध केला आहे. यामध्ये लक्ष्मी विलास बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ एस. सुंदर यांच्या नियुक्तीचा समावेश होता.
हेही वाचा-साखर निर्यातीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ; साखर कारखान्यांना मोठा दिलासा
लक्ष्मी विलास बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार तीन सदस्यीय समिती ही बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व सीईओच्या जबाबदार पार पाडणार आहे. या समितीमध्ये समितीचे अध्यक्ष शक्ती सिन्हा, हंगामी सीईओ मीता मखन आणि सतीश कुमार कार्ला यांचा समावेश आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने २७ सप्टेंबरला तीन स्वतंत्र संचालकांची समिती नियुक्ती करण्यासाठी परवानगी दिली आहे. बँकेचे ठेवीदार, बाँडचे ठेवीदार, खातेदार आणि कर्जदार यांचे हिताचे चांगल्या पद्धतीने संरक्षण करण्यात येत असल्याचेही बँकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.