नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीत भडका सुरू असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ सोसावी लागणार आहे.
दिल्लीत १४.२ किलोग्रॅमच्या घरगुती सिलिंडरसाठी ग्राहकांना ७६९ रुपये मोजावे लागणार आहेत. हे दर उद्या दुपारी १२ वाजल्यापासून लागू होणार आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती फेब्रुवारीमध्ये दुसऱ्यांदा वाढल्या आहेत. यापूर्वी सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी बिगर अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ४ फेब्रुवारीला २५ रुपयाने वाढविली होती. स्वयंपाकाचा गॅस हा कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूपासून मिळतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे दर वाढविण्यात आले आहेत.
हेही वाचा-अॅमेझॉनवर विक्रेत्यांना मराठीतही करता येणार व्यवसायाची नोंदणी
पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ-
पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग सातव्या दिवशी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी डिझेलचे दर प्रति लिटर २९ पैशांनी तर पेट्रोलचे दर २६ पैशांनी दिल्लीत वाढले आहेत. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८८.८९ रुपये तर डिझेलचे दर ७९.३५ रुपये आहेत. गेल्या सात दिवसांत पेट्रोलचे दर प्रति लिटर २.०६ रुपये तर डिझेलचे दर २.५६ रुपयांनी वाढले आहेत.
हेही वाचा-सरकारी आणि इतर क्रिप्टोचलन एकाचवेळी स्वतंत्रपणे चालू शकतात-आयएएमएआय