वॉशिंग्टन - अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. अशा आपत्कालीन स्थितीत कोरोना लसीचा वापर करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी औषध कंपनी फायझरने अमेरिकेच्या नियामक संस्थेकडे केली आहे. फायझरकडून पुढील महिन्यात कोरोना लसीचे मर्यादित डोस उपलब्ध होणार आहेत.
फायझर कंपनीने जर्मनीची भागीदार कंपनी बायोनटेक कंपनीच्या मदतीने कोरोनावरील लशीची निर्मिती केली आहे. ही लस कोरोना महामारीवर ९५ टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. संरक्षण आणि सुरक्षितता असल्याने फायझरची लस आपत्कालीन वापरासाठी पात्र असली पाहिजे. पूर्ण लशीची चाचणी होण्यापूर्वी अन्न आणि औषध प्रशासन लसीच्या वापरासाठी परवानगी देऊ शकते.
तज्ज्ञांचा हा आहे सल्ला-
जगभरासह अमेरिकेत कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नियामक संस्थेवर लशीची परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यावर दबाव आहे कोरोनावरील मॉर्डना लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी अमेरिकेत यशस्वी ठरली आहे. अमेरिकेच्या संसर्गजन्य रोगांचे तज्त्र डॉ. अँथोनो फॉकी म्हणाले, की फायझरने लसीबाबत घोषणा केली असली तरी मास्क आणि इतर उपाययोजना टाळणे खूप घाईचे ठरेल. आम्हाला सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना दुप्पट करण्याची गरज आहे.
फायझरची मॉर्डनाबरोबर आहे स्पर्धा-
फायझरच्या लशीचे २५ दशलक्ष डोस हे डिसेंबर अखेर उपलब्ध होणार आहेत. तर जानेवारीत ३० दशलक्ष व फेब्रुवारीत ३५ दशलक्ष डोस उपलब्ध होतील, असे नॅशनल अॅकडमी ऑफ मेडिसीनने मागील आठवड्यात सांगितले आहे. फायझरची स्पर्धक असलेली मॉर्डनाची लसही स्पर्धेत मागे नाही. मॉर्डनानेही आपत्कालीन परिस्थितीत कोरोनाच्या लसीचा वापर करण्याची अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.
हा आहे फायझरचा दावा-
कोरोना लस बनवण्याच्या शर्यतीत सध्या फायझर आघाडीवर आहे. मोठ्या प्रमाणात घेतलेल्या चाचणीचा प्रिलिमिनरी डेटा जाहीर करणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. आपली कोरोना लस ही ९० टक्के परिणामकारक असल्याचा दावा या कंपनीने केला असला, तरी डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार ही लस घेतलेल्या स्वयंसेवकांना मोठ्या प्रमाणात हँगओव्हर, ताप आणि अंगदुखी असे दुष्परिणाम दिसून आले. विशेष म्हणजे, दुसऱ्या डोसनंतर हे दुष्परिणाम अधिकच जाणवल्याचे एका स्वयंसेविकेने सांगितले.