नवी दिल्ली - महागाईची झळ सोसणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. वर्षभरानंतर पहिल्यांदाच पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर १८ पैशांनी तर डिझेलचे दर १७ पैशांनी कमी झाले आहेत.
इंधन दरात कपात झाल्यानंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९०.९९ रुपये आहे. यापूर्वी दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ९१.९७ रुपये होते. डिझेलची किंमत प्रति लिटर ८१.४७ रुपयांवरून ८१.३० रुपये झाली आहे. इंधन दर कपातीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९७.५७ रुपयांवरून ९७.४० रुपये आहे. तर डिझेलचा दर ८८.६० रुपयांवरून प्रति लिटर ८८.४२ रुपये आहे. देशामधील विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर भिन्न आहेत. विविध राज्यांमध्ये व्हॅटचे प्रमाण वेगळे असल्याने हे दर भिन्न आहेत.
हेही वाचा-हिरो मोटोकॉर्पची वाहने एप्रिलपासून महागणार
वर्षभरानंतर कपात असली तर इंधनाचे दर चढेच!
गतवर्षी १६ मार्च २०२० मध्ये इंधन दरात कपात झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच आज इंधन दरात कपात झाली आहे. असे असले तरी वर्षभरात पेट्रोलचे दर प्रति लिटर २१.५८ रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर १९.१८ रुपयांनी वाढले आहेत. गेल्या महिन्यात राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश या राज्यांमधील काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांहून अधिक जास्त आहेत. दुसरीकडे, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ, पाँडेचरीमध्ये विधानसभा निवडणूक पार पडत असताना इंधनाचे दर पंधरा दिवसांहून अधिक काळ स्थिर राहिले आहेत.
हेही वाचा-हायपरएक्सकडून गेमिंग चाहत्यांसाठी खास पल्सफायर हेस्ट गेमिंग माऊस लाँच
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दर घसरले!
जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले आहेत. वेस्ट टेक्सास इंटरमिडीयटमध्ये मे महिन्यासाठी न्यूयॉर्कमध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून प्रति बॅरल ५७.७६ रुपये डॉलर आहेत. हे दर ५ फेब्रुवारीनंतर सर्वाधिक कमी आहेत. कोरोनाचा जगभरात उद्रेक होत असताना मंदीतून सावरणाऱ्या जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसण्याची शक्यता आहे.