नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या किमती तेल कंपन्यांनी दोन महिन्यानंतर वाढल्या आहेत. पेट्रोलचा दर दिल्लीत प्रति लिटर १७ पैशांनी वाढून ८१.२३ रुपये आहे. तर डिझेलचे दर प्रति लिटर २२ पैशांनी वाढून ७०.६८ रुपये आहे.
कोरोनाच्या संकटाने जगभरात कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आढावा घेऊन सरकारी तेल कंपन्यांकडून इंधनाचे दर रोज निश्चीत करण्यात येतात. ऑक्टोबरपासून कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत ४० डॉलरपर्यंत राहिली होती.त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर राहिल्या आहेत.
कोरोनाची लस यशस्वी होण्याच्या शक्यतेने मागणीत वाढ-
रुपयाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य वाढले तरी किरकोळ इंधनाच्या किमती वाढतात. कोरोनाची लस यशस्वी ठरण्याची शक्यता असल्याने जागतिक अर्थव्यवस्था सावरण्यास सुरुवात झाली आहे. सतत घसरणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्री बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ४४ डॉलर आहे. येत्या काही आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचे सरकारी तेल कंपनीमधील सूत्राने सांगितले.
खनिज तेलाच्या साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या किमती एप्रिलमध्ये शून्यापेक्षाही कमी झाल्या होत्या. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसला आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
फायझरची लस ९० टक्के परिणामकारक असल्याचा दावा-
कोरोना लस बनवण्याच्या शर्यतीत सध्या फायझर आघाडीवर आहे. मोठ्या प्रमाणात घेतलेल्या चाचणीचा प्रिलिमिनरी डेटा जाहीर करणारी ही पहिली कंपनी ठरली आहे. आपली कोरोना लस ही ९० टक्के परिणामकारक असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.