नवी दिल्ली - वाहन उद्योगातील मंदी दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मारुती सुझुकी इंडियामधील ३ हजार हंगामी कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत.
हंगामी कर्मचाऱ्यांच्या सेवेचे नुतनीकरण करण्यात आले नसल्याची माहिती मारुती सुझुकी इंडियाचे चेअरमन आर.सी.भार्गव यांनी दिली. कायम असलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, हंगामी कर्मचारी कपात करणे हा व्यवसायाचा भाग आहे. जेव्हा मागणी असते, तेव्हा अधिकाधिक हंगामी कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले जाते. जेव्हा मागणी कमी होते, त्यांची कामावरून कमी केले जाते, अशी त्यांनी माहिती दिली.
थोडासाही वाहन विक्रीवर परिणाम म्हणजे रोजगारनिर्मितीवर मोठा परिणाम -
वाहन उद्योगामधून (ऑटोमोबाईल) विक्री, सेवा, विमा, परवाने, कर्ज, वाहनांचे अॅसेसरीज, चालक, पेट्रोल पंप, वाहतूक अशा माध्यमामधून रोजगार निर्मिती होते. थोडासाही वाहन विक्रीवर परिणाम झाला तरी रोजगारावर मोठा परिणाम होतो, असा आर.सी. भार्गव यांनी इशारा दिला. सध्या मंदीचा वाहन उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. प्रत्यक्षात हा परिणाम तेवढा दिसून येत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. येत्या तिसऱ्या व चौथ्या तिमाहीदरम्यान वाहनांची विक्री वाढेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. वाहनांचे संक्रमण (ट्रान्सिशन) २०२१ पर्यंत बीएस-६ मध्ये संक्रमण पूर्ण होणार असल्याने उद्योगाचे पुनरुज्जीवन होईल, असा आर.सी.भार्गव यांनी विश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागात चांगला मान्सून झाल्याने सणाच्या वेळी वाहन विक्री तेथे वाढेल, असेही ते म्हणाले.
हायब्रीड कार आणि सीएनजी कारलाही करात सवलत द्यावी -
जर सरकार काही घोषणा करून सकारात्मक पावले उचलली तर परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. मात्र, जीएसटी कपात करणे व योग्य सुधारणा करणे, हे सर्वस्वी सरकारवर अवलंबून आहे. सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना जीएसटीमध्ये सवलत देवू शकते. हायब्रीड कार आणि सीएनजी कारला करात सवलत द्यावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.