गुरुग्राम - दसरा-दिवाळी सणानिमित्त ई-कॉमर्स कंपन्यांनी स्मार्टफोनच्या खरेदीवर बंपर सेल जाहीर केले आहेत. त्याचा परिणाम म्हणून देशातील ४ जी स्मार्टफोनच्या वापरकर्त्यांची संख्या ६० लाखांनी वाढणार आहे.
येत्या सणानिमित्त होणाऱ्या विक्रीत सुमारे १ कोटी स्मार्टफोनची विक्री होईल, असा अंदाज टेकएआरसी या बाजारपेठेचे संशोधन करणाऱ्या संस्थेने व्यक्त केला. त्यामुळे ४ जी स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांची संख्या १.३ टक्क्यांनी वाढून ७२.९ टक्के होणार आहे.
ऑनलाईन विक्रीमध्ये आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. या संधीचा फायदा घेत मोबाईल वापरकर्ते ४ जी स्मार्टफोनकडे वळतील, असे टेकएआरसीचे संस्थापक फैसल कावूसा यांनी म्हटले आहे. जर फ्लिपकार्ट आणि अॅमेझोनची मार्केटिंग आणि जाहिरातीची रणनीती चांगली झाली तर ४ जी स्मार्टफोनचा देशात लक्षणीय वापर वाढणार आहे.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, ओडिसा आणि कर्नाटकमध्ये ४ जी स्मार्टफोनच्या वापराचे प्रमाण कमी आहे. देशात अजूनही ४ जी शिवाय स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे ३० टक्के प्रमाण आहे.