नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झालेल्या दराच्या घसरणीमुळे देशातील विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. शुक्रवारी लागू झालेल्या दरांनुसार, सिलिंडरच्या किंमतीमध्ये तब्बल १६२.५० रुपये प्रति सिलिंडर एवढी कपात करण्यात आली आहे.
ज्या व्यक्तींनी आपली सबसिडी सोडली आहे, त्यांना मिळणारा सिलिंडर; किंवा मग वर्षाचे १२ अनुदानित सिलिंडर घेतल्यानंतर घेतले जाणारे जादाचे सिलिंडर यांचा समावेश विना-अनुदानित सिलिंडरांमध्ये होतो. गेल्या तीन महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा या किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. यापूर्वी मार्चमध्ये ५३, तर एप्रिलमध्ये ६१.५० रुपयांची कपात करण्यात आली होती.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. याचा परिणाम म्हणून एलपीजी गॅस सिलिंडरांच्या किंमतीमध्येही कपात करण्यात येत आहे.
हेही वाचा : वाहन उद्योगाचे कंबरडे मोडले, एप्रिल महिन्यात शून्य टक्के विक्री