सिंगापूर/नवी दिल्ली - रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे सलग १३ व्या वर्षी फोर्ब्सच्या सर्वात १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत पहिल्या क्रमांवर आले आहेत. अंबानी यांच्या संपत्तीत ३७.३ अब्ज डॉलरची वाढ होऊन एकूण ८८.७ अब्ज संपत्ती झाली आहे. त्यांच्या एकूण संपत्तीत ७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कोरोना महामारी आणि टाळेबंदीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. असे असले तरी फोर्ब्सच्या सर्वात १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीतील पन्नास टक्के जणांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. या १०० श्रीमंत भारतीयांची संपत्ती गतवर्षीहून १४ टक्क्यांनी वाढून ५१७.५ अब्ज डॉलरची संपत्ती झाली आहे. दुसरीकडे मुंबई शेअर बाजार गतवर्षीच्या तुलनेत पाहता स्थिर राहिला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरची किंमत टाळेबंदीतही वाढली आहे. अंबानी यांनी जिओमध्ये जागतिक कंपन्यांच्या गुंतवणुकीतून २० अब्ज डॉलर मिळविले आहेत. सध्या, जागतिक कंपन्यांकडून रिलायन्स रिटेलध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे. फोर्ब्स भारतीय श्रीमंताच्या यादीत गौतम अदानी यांचा दुसरा क्रमांक आहे. त्यांची संपत्ती ६१ टक्क्यांनी वाढून २५.२ अब्ज डॉलर झाली आहे. अदानी यांना भारतीय वाहतूक क्षेत्रात बळकट स्थान मिळवण्याची इच्छा आहे. त्यांनी मुंबई विमानतळात ७४ टक्के हिस्सा विकत घेतला आहे.
फोर्ब्स एशियाचे भारतीय संपादक आणि एशिया वेल्थ एडिटर नाझनीन करमाली म्हणाल्या, की कोरोना महामारीचा एकाचवेळी दोन परिणाम दिसून आले आहेत. सर्वाधिक श्रीमंत १०० भारतीयांना त्यांची संपत्ती वाढविण्याचे नियोजन करण्यात आले. तर दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेत घसरण झाली आहे. श्रीमंताच्या यादीत नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. त्यामधून भारतीयांच्या डीएनएमध्ये नवउद्योजकता असल्याचे सिद्ध झाले आहे. हे नवउद्योजक अडथळ्यांवर मात करणार आहेत, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
कोरोनाच्या संकटात स्थावर मालमत्ता क्षेत्रावर परिणाम झाल्याने या क्षेत्रातील अनेक श्रीमंताच्या यादीमधून बाहेर पडले आहेत. यामध्ये फ्युचअर ग्रुपचे संस्थापक किशोर बियानी यांचा समावेश आहे. गतवर्षी सर्वात श्रीमंत भारतीय १०० च्या यादीत समावेश होण्यासाठी १.४ अब्ज डॉलरची संपत्ती असणे आवश्यक होते. यंदा हे प्रमाण कमी होऊन १.३३ अब्ज डॉलर आहे.