मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सात दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आजपासून जात आहेत. यावेळी ते बहुचर्चित अशा ह्युस्टनमधील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७४ व्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा बहुआयामी असणार आहे. कारण यामध्ये अमेरिका-भारतामधील व्यापार संबंध, तेथील व्यवसाय समुदायांशी गुंतवणुकीसाठी चर्चा व ह्युस्टनमधील भारतीय लोकांना मोदी संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा दौरा हा २१ ते २७ सप्टेंबरदरम्यान असणार आहे. टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात हाउडी मोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भारतीय वंशाचे ५० हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत.
असे असणार कार्यक्रमाचे वेळापत्रक
- भारतीय वेळेप्रमाणे पंतप्रधान मोदी शनिवारी रात्री ११:०५ वाजून मिनिटाला ह्युस्टनमधी जॉर्ज बुश आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील.
- रविवारी पहाटे साडेचार वाजता उर्जा क्षेत्र कंपन्यांच्या १६ सीईओची भेट घेणार आहेत. त्यासाठी हॉटेल पोस्ट ओक येथे राउंडटेबल बैठक घेण्यात येणार आहे. ह्युस्टनला जागतिक उर्जेची राजधानी म्हणून ओळख आहे.
- सकाळी सहा वाजून ५ मिनिटाला ते अनिवासी भारतीयांशी संवाद साधणार आहेत.
- ह्युस्टनमधील कार्यक्रम हा एनआरजी क्रीडांगणामध्ये पार पडणार आहे. हे अमेरिकेमधील सर्वात मोठे फुटबॉल मैदान म्हणून ओळखले जाते. एनआरजी स्टेडियमचे मुख्य गेट हे साडेचार वाजता उघडण्यात येणार आहे.
- क्रीडांगणावर सकाळी साडेसात वाजेपर्यंत अनिवासी भारतीय येणार आहेत. त्यानंतर नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता संपेल.
हा कार्यक्रम हिंदी, इंग्रजी व स्पॅनिशमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह डोनाल्ड ट्रम्प हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी हे अमेरिकन लोकप्रतिनिधींशी (यूएस काँग्रेस) संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेसाठी रवाना होणार आहेत.