नवी दिल्ली - देशाच्या उत्पादन क्षेत्राने मे महिन्यात चांगली कामगिरी केली. मागणी वाढल्याने अधिक उत्पादन झाल्याचे उत्पादन क्षेत्राच्या सर्व्हेत म्हटले आहे. उत्पादन वाढल्याने रोजगार निर्मिती झाल्याचेही सर्व्हेत म्हटले आहे.
निक्की इंडिया मॅन्युफॅक्च्युअरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (औद्योगिक उत्पादन निर्देशांक) हा एप्रिल २०१९ मध्ये ५१.८ होता. तर मे महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची ५२.७ एवढी नोंद झाली आहे. हा गेल्या तीन महिन्यातील सर्वात अधिक औद्योगिक निर्देशांक आहे.
निर्देशांकाच्या अंकातून असे समजते औद्योगिक उत्पादन-
गेल्या २२ महिन्यात औद्योगिक निर्देशांक हा ५० अंशाहून अधिक राहिला आहे. हा निर्देशांक ५० हून अधिक असणे म्हणजे उत्पादन क्षेत्राचा विस्तार अधिक आहे. तर ५० हून कमी निर्देशांक म्हणजे उत्पादन कमी होणे असा अर्थ होतो.
नव्या ऑर्डर मिळाल्याने उत्पादन वाढल्याचे आयएचएस मार्किटचे मुख्य अर्थतज्ज्ञ पॉलियान्ना डी लीमा यांनी अहवालात म्हटले आहे. एप्रिल २०१८ नंतर प्रत्येक महिन्यात रोजगार निर्मिती वाढली आहे, असेही सर्व्हेत म्हटले आहे. मागणी वाढणार असल्याबाबात उत्पादकांना विश्वास आहे. सरकारी धोरण, मार्केटिंगच्या योजना, अनेक प्रकल्प प्रतिक्षेत असणे आणि आर्थिक सुधारणांमुळे उत्पादकांमधील विश्वास वाढल्याचे लीमा यांनी सांगितले.
उत्पादकांनी किमती वाढविल्या नसल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविले आहे. असे असले तरी गेल्या १४ वर्षांच्या सर्व्हेंच्या तुलनते उत्पादन क्षेत्राची कमी वृद्धी होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
आरबीआयच्या पतधोरण समितीची आजपासून द्विमासिक बैठक सुरू होत आहे. ही समिती गुरुवारी पतधोरण जाहीर करणार आहे. त्यापूर्वी औद्योगिक उत्पादनाची आकेडवारी समोर आली आहे.