गुवाहाटी - कोरोना महामारीत गुवाहाटी टी ऑक्शन सेंटरने (जीटीएसी) विकलेल्या चहापत्तीला उच्चांकी भाव मिळाला आहे. मनोहारी गोल्ड स्पेशलिटी ही चहापत्ती ७५ हजार रुपये प्रति किलोला विकण्यात आली आहे. दोन वर्षापूर्वी या चहापत्तीला ५० हजार रुपये प्रति किलो दर मिळाला होता.
जीटीएसीला एका वर्षाच्या विश्रांतीनंतर यंदा 'मनोहारी गोल्ड स्पेशलिटी' चहापत्तीची विक्री करण्याची संधी मिळाली आहे. यंदा चहापत्तीला ७५ हजार रुपये प्रति किलो दर मिळाल्याचे गुवाहाटी टी ऑक्शन बायर्स ऑक्शनचे (जीटीएबीए) सचिव दिनेश बिहानी यांनी सांगितले. या महागड्या चहापत्तीची विक्री ब्रोकर्स प्रायव्हेड लि. कंपनीने केली आहे. तर खरेदी गुवाहाटीमधील विष्णू टी कंपनीने केली आहे. ही कंपनी ऑनलाईन माध्यमातून चहापत्तीची विक्री करत असल्याचे बिहानी यांनी सांगितले.
या कारणाने चहापत्तीला मिळतो जादा भाव-
जीटीएबीएचे सचिव बिहानी म्हणाले, की कोरोना महामारीत संपूर्ण जगावर परिणाम होत असताना हे मोठे यश मिळाले आहे. या चहाची किंमत चव, रंग आणि वासावरून ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आसाम डिकोम टी इस्टेटने 'गोल्डन बटरफ्लाय' या चहापत्तीची गुवाहटी टी ऑक्शन सेंटरमधून प्रति किलो ७५ हजार रुपयांना विक्री केली होती.