मुंबई - मॅन्गेटा पॉवर कंपनी राज्यात १० हजार ई-दुचाकी चार्जिंग स्टेशन सुरू करणार आहे. हे चार्जिंग स्टेशन मुंबई व पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरामध्ये सुरू करण्यात येणार आहेत.
मॅन्गेटा पॉवर कंपनीने येत्या तीन वर्षात १० हजार चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यापैकी ५०० चार्जिंग स्टेशन लवकरच मुंबई महानगरांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. तर ई-दुचाकी भाड्यानेही देण्यात येणार आहे. त्यासाठी एमॅट्रिक्समाईलबरोबर करार करण्यात येणार असल्याचे मॅग्नेटा पॉवरचे सहसंस्थापक मॅक्ससन लूईस यांनी सांगितले.
मॅग्नेटाचे मुंबई, नवी मुंबई, पुणे, हैदराबाद, कोची आणि नाशिकमध्ये चारचाकींसाठी ६४ चार्जिंग स्टेशन आहेत. तर आणखी ८० चार्जिंग स्टेशन सरकारी योजनेंतर्गत सुरू करण्यात येणार आहेत. मॅग्नेटाला सरकारी कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियमने २०१८ मध्ये बीजभांडवल पुरविले आहे. त्यानंतर शेल आणि मायक्रोसॉफ्ट ग्लोबल स्टार्टअप फंडमधूनही मॅग्नेटाला भांडवल मिळाले आहे.
सर्वप्रथम कंपनीने पुणे-बंगळुरू महामार्गावर २०१८ मध्ये इलेक्ट्रिक व्हिकल चार्चिंग स्पेस सुरू करण्यात आला. कंपनीकडून कारसाठी प्रति युनीट २० रुपये आकारण्यात येतात. इलेक्ट्रिक कार पूर्ण चार्ज होण्यासाठी १२ ते १४ युनिट लागतात. सध्याच्या दराप्रमाणे डीसी चार्जिंग स्टेशनसाठी ५ ते २५ लाखांची गुंतवणूक लागते, अशी माहिती कंपनीचे सीईओ लूईस यांनी दिली.