नवी दिल्ली - जेट एअरवेजची विमान सेवा बंद असल्याने अनेक वैमानिकांनी नोकऱया सोडल्या आहेत. अशा वैमानिकांना कोरियन एअर कंपनीने नोकऱ्यांसाठी मोठी संधी दिली आहे. ही कंपनी वैमानिकांना सेवेत घेण्यासाठी दिल्लीसह मुंबईत शुक्रवारी व शनिवारी रोड शो घेणार आहे.
वैमानिकांसाठी असणारा रोड शो हा नोकरी मेळाव्याप्रमाणे असणार असल्याचे एका वरिष्ठ वैमानिकाने सांगितले. कोरिअर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केल्याचेही ते म्हणाले.
जेट एअरवेज पायल युनियन नॅशनल एव्हिटर्स गिल्ड (एनएजी) या मेळाव्याचे आयोजन करणार आहे. हा रोड शो आयोजित होणार असला तरी जेट एअरवेज पुन्हा सुरू होईल, अशी एनएजीच्या अध्यक्षांना अजूनही आशा वाटते. एनएजीचे देशात सुमारे ९०० ते १००० वैमानिक सदस्य आहेत.
जेट एअरवेजची सेवा बंद झाल्यानंतर त्या कंपनीतील अनेक वैमानिक हे स्पाईजेट, एअर इंडिया, इंडिगो आणि विस्तारामध्ये रुजू झाले आहेत. कोरियन एअर कंपनीला बी ७७७-३००एस या मोठ्या विमानांसाठी सुमारे ३०० ते ४०० वैमानिकांची आवश्यकता आहे. या कंपनीच्या मालकीची १६७ विमाने आहेत. तर ४४ देशांमध्ये कंपनीकडून विमान सेवा दिली जाते.