नवी दिल्ली – गेली सतरा दिवस पेट्रोल व डिझेलचे दर वाढताना एक नवीनच बदल दिसून येत आहे. देशात पहिल्यांदाच डिझेलचे दर हे पेट्रोलहून अधिक वाढण्याच्या दिशेने जात आहेत. इंधनाची दरवाढ अशीच सुरू राहिली तर दिल्लीत पेट्रोलहून डिझेल अधिक महाग झाल्याचे दिसून येणार आहे.
जगभरात डिझेलचे दर हे पेट्रोलहून अधिक असतात. कारण डिझेलच्या उत्पादनाचा खर्च हा पेट्रोलहून अधिक असतो. मात्र, भारतामधील कररचनेमुळे डिझेलवर पेट्रोलच्या तुलनेत कमी कर लागतो. त्यामुळे नेहमीच पेट्रोलची किंमत ही डिझेलहून अधिक असते. हे अनेक वर्षांपासून देशातील चित्र आहे.
दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर हा 79.40 रुपये आहे. तर पेट्रोलचा दर केवळ 36 पैशांनी कमी म्हणजे 79.76 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या काही दिवसांपासून डिझेलचे दर हे 50 ते 60 पैशांनी प्रति लिटर वाढत आहेत. तर मंगळवारी पेट्रोलच्या किमती प्रति लिटर 20 पैशांनी कमी झाल्या आहेत. जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर हे वाढत आहेत. याचे अनुकरण सार्वजनिक तेल कंपन्यांनी केले तर येत्या आठवड्यात डिझेलच्या किमती पेट्रोलहून अधिक असणार आहेत, असे खनिज तेल क्षेत्रातील तज्ज्ञाने सांगितले. जर सरकारने कररचनेत बदल केला नाही, तर हीच परिस्थिती पुढे काही वर्षे राहण्याची शक्यता आहे.
पेट्रोल-डिझेलची मूळ किंमत किती असते?
विशेष म्हणजे भारतात डिझेलची मूळ किंमत ही पेट्रोलहून अधिक आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या माहितीमुसार दिल्लीत पेट्रोलची मूळ किंमत (कोणत्याही कराशिवाय) 22.11 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 22.93 रुपये प्रति लिटर आहे. किरकोळ विक्रीत पेट्रोलची किंमत ही डिझेलहून अधिक जास्त आहे. ही अनेक वर्षापासून चालत आलेले आहे. केंद्र सरकार पेट्रोलवर प्रति लिटर 32.98 रुपये उत्पादन शुल्क आकारते. तर डिझेलवर प्रति लिटर 31.83 उत्पादन शुल्क आकारते. तर दिल्ली सरकार पेट्रोलवर प्रति लिटर 17.71 व्हॅट तर डिझेलवर 17.60 रुपये लिटर व्हॅट आकारते. डिझेलच्या किमती वाढत असल्याने वाहतूक क्षेत्रांना फटका बसणार आहे. यापूर्वीच देशातील वाहतूकदारांच्या संघटनेने संप पुकारण्याचा इशारा दिला होता. वाहचालकांच्या जमेची बाजू म्हणजे पेट्रोल व डिझेलच्या किमती जवळपास सारख्या होत असताना भेसळीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.