श्रीनगर - दिवाळी सणाच्या तोंडावर जम्मू आणि काश्मीरसह लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट ठरणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जम्मू आणि काश्मीरसह केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे फायदे देण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने काढले आहेत. हे फायदे ३१ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना लागू होणार आहेत.
सातव्या वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंजूरी दिली आहे. या निर्णयाने काश्मीरच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणता येईल, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू आणि काश्मीरसह लडाखच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश काढले आहेत. याचा जम्मू आणि काश्मीर तसेच केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमधील ४.५ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सरकारच्या तिजोरीवर सुमारे ४ हजार ८०० कोटींचा भार पडणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या फायद्यात कर्मचाऱ्यांना मुलांना देण्यात येणारा शिक्षणभत्ता, हॉस्टेल भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता आदी भत्त्यांचा समावेश आहे.