नवी दिल्ली – कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना भारतीय विमा नियामक प्राधिकरणाने (आयआरडीए) ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. आयआरडीएने 29 जनरल आणि आरोग्य विमा कंपन्यांना कमी मुदतीचे ‘कोरोना कवच आरोग्य विमा’ सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
काही विमा कंपन्यांनी तीन आणि साडेतीन महिन्यांच्या कालावधीच्या 'कोरोना कवच विमा योजना' जाहीर केल्या आहेत. तसेच सहा महिने, साडेसहा महिने, नऊ महिने आणि साडेनऊ महिन्यांच्या कालावधीच्या विमा योजना कंपनीने जाहीर केल्या आहेत. त्यासाठी ग्राहकांना किमान 50 हजार ते 5 लाखापर्यंतचा एकूण विमा हप्ता द्यावा लागतो.
आयआरडीएने कोरोना कवच विमा योजनेसाठी काही सरकारी व खासगी विमा कंपन्यांना परवानगी दिली आहे. यामध्ये ओरियन्टल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स, एसबीआयजनरल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड, एचडीएफसी ईआरजीओ, बजाज अलायन्स, भारती अक्सा आणि टाटा एआयजीचा समावेश आहे.
पॉलिसी बाजार डॉट कॉमचे (आरोग्य विमा) प्रमुख अमित छाब्रा म्हणाले, की कोरोना कवच योजना परवडणाऱ्या दरात आहे. ज्या ग्राहकांना व्यापक आरोग्य विमा घेणे परवडत नाही, ते कोरोना कवच विमा योजना घेवू शकतात. ही विमा योजना वयोगट 18 ते 65 वयोगटातील नागरिकांसाठी आहे.