नवी दिल्ली - तुम्ही जर रेल्वेसाठी नेहमी ऑनलाईन बुकिंग करत असाल तर तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण आयआरसीटीसीने ई-तिकीटावर सेवा शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडियन रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनला (आयआरसीटीसी) ऑनलाईन तिकिटावर सेवा शुल्क करण्याच्या निर्णयाला रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे.
तात्पुरत्या काळासाठी सेवा शुल्क करण्यात आले होते माफ-
ई-तिकिटावरील सेवा शुल्क हे तात्पुरत्या काळासाठी माफ करण्यात आले होते. रेल्वे मंत्रालय पुन्हा सेवा शुल्क लागू करू शकते, असे यापूर्वी रेल्वे मंत्रालयाने म्हटले होते. वित्त मंत्रालयाने दिलेल्या सल्ल्यानंतर आयआरसीटीसीने योग्यवेळी सेवा शुल्क लागू करण्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते.
आयआरसीटीसीकडून विना एसी तिकिटावर २० रुपये सेवा शुल्क लावण्यात येते. तर एसी तिकिटासाठी ४० रुपये सेवा शुल्क आकारण्यात येते. सेवा शुल्क पूर्वीप्रमाणेच लागू करायचे की वाढवायचे याबाबतचा निर्णय आयआरसीटीसी लवकरच घेणार आहे. अर्थव्यवस्थेत डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने विविध निर्णय घेतले होते. त्याचाच भाग म्हणून रेल्वे विभागाने तीन वर्षापूर्वी सेवा शुल्क रद्द केले होते.