नवी दिल्ली - एनडीए पुन्हा सत्तेत आल्यानंतर २३ मेपासून शेअर बाजाराच्या निर्देशांकात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसात शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८७२ अंशाची वाढ झाली. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या संपत्तीत एकूण ३.८६ लाख कोटींची वाढ झाली आहे.
शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅपिटायलायझेशन ३ लाख ८६ हजार २२०.४१ कोटीने वाढले. गुरुवारी शेअर बाजार बंद होताना बीएसईच्या नोंदणीकृत कंपन्यांचे भांडवली मुल्य हे १ कोटी ५० लाख २५ हजार १७५.४९ रुपये एवढे होते. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजाराने गेल्या दहा वर्षातील सर्वात मोठी उसळी घेवून ४०,१२४.९६ वर पोहोचला होता.
शेअरखानचे मुख्य सल्लागार हेमांग जानी म्हणाले, भारतीय बाजाराने दिवसाखेर सकारात्मक नोंद केली. गेली दोन दिवस विदेशी गुंतवणुकदार वित्तीय संस्थाकडून शेअरची खरेदी होत असल्याने शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्याने वाढत आहे. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध, मंदावलेला जागतिक विकासदर, कच्च्या तेलाचे वाढलेले दर हे देशातील बाजाराला धोके आहेत. मात्र निवडणुकीनंतर बाजार पुन्हा पूर्ववत आला असून वधारत असल्याचे जानी यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसात शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८७१.९ अंशाची वाढ झाली. शेअर बाजार बंद होताना सोमवारी २४८.५७ अंशाने वधारून ३९,६८३.२९ अंशावर पोहोचला.