नवी दिल्ली -कोरानामुळे दोन महिन्यांपासून सुरू राहिलेल्या टाळेबंदीचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाला (जीडीपी) मोठा फटका बसणार आहे. मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जीडीपीचा विकासदर हा १.२ टक्के राहिल, असे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.
स्टेट बँकेच्या इकोरॅप अहवालात आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपी ६.८ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपीचा विकासदर हा घसरून ४.७ टक्के झाला होता. हा गेल्या सात वर्षातील सर्वात कमी विकासदर ठरला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकासदर हा ५.१ टक्के तर दुसऱ्या तिमाहीत ५.६ टक्के विकासदर होता.
हेही वाचा-इंडिगोतील प्रवासी आढळला कोरानाबाधित; विमानातील सर्व विलगीकरणात!
मार्चच्या शेवटच्या सात दिवसात संपूर्णपणे देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे सात दिवसात १.४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे इकोरॅप अहवालात म्हटले आहे. देशातील १० राज्ये हे देशाच्या जीडीपीत ७५ टक्के योगदान देतात. त्यापैकी एकट्या महाराष्ट्राचे देशाच्या जीडीपीच्या १५.६ टक्के नुकसान झाले आहे.
हेही वाचा-रिलायन्सकडून २०० शहरांमध्ये जिओमार्टची सेवा लाँच
दरम्यान, मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमधील जीडीपीची आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून २९ मेरोजी जाहीर होणार आहे.