नवी दिल्ली - देशातील इंधनाची मागणी फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच सणामुळे ऑक्टोबरमध्ये वाढली आहे. कोरोना महामारी आणि टाळेबंदीमुळे देशातील इंधनाच्या मागणीत घसरण झाली होती.
पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीत ऑक्टोबरमध्ये २.५ टक्क्यांनी वाढ होऊन १७.७७ दशलक्ष टन एवढी झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये १७.३४ दशलक्ष टन एवढे पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीचे प्रमाण होते. ही माहिती तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम व्यवस्थापन आणि विश्लेषण सेलने दिली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या वापराचे प्रमाण कोरोनापूर्वीच्या स्थितीत-
कोरोनाच्या पूर्वीच्या स्थितसारखीच सप्टेंबरमध्ये पेट्रोलची मागणी वाढली आहे. तर डिझेलची मागणी ही ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या पूर्वीच्या स्थिती सारखी झाली आहे. डिझेलची मागणी ७.४ टक्क्यांनी वाढून ६.५ दशलक्ष टनपर्यंत पोहोचली आहे. तर पेट्रोलची विक्री ४.५ टक्क्यांनी वाढून २.५४ दशलक्ष टनपर्यंत पोहोचली आहे. डिझेलच्या वापराचे प्रमाण ऑक्टोबरमध्ये वर्षभरात सर्वाधिक राहिले आहे.
टाळेबंदीमुळे इंधनाच्या विक्रीत घसरण-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू केल्याने एप्रिलमध्ये इंधनाची मागणी ४९ टक्क्यांनी घसरली होती. टाळेबंदीत बहुतांश सर्व उद्योग आणि रस्त्यांवर वाहने येणे बंद झाले होते. टाळेबंदीत सुमारे ६९ दिवस स्थानिक व राज्यपातळीवर वाहतुकीवर निर्बंध होतो. केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने टाळेबंदीचे नियम शिथील केले आहे. सणादरम्यान इंधनाची मागणी वाढली आहे. असे असले तरी सार्वनजिक वाहतू, शाळा व शैक्षणिक संस्था अद्यापही बंद आहेत.
टाळेबंदीत केवळ एलपीजीच्या विक्रीत वाढ-
टाळेबंदीत केवळ एलपीजीच्या मागणीत वाढ झाली होती. या काळात सरकारने २.४ दशलक्ष टन एलपीजीचे वितरण केले होते. असे असले तरी विमान इंधनाच्या विक्रीत कमालीची घसरण झाली आहे. देशांतर्गत काही प्रमाणात विमान वाहतूक सेवेवर तर आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर पूर्णपणे निर्बंध लागू आहेत.