नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक असलेला भारत हा श्रीलंकेला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्यात करणार आहे. त्यासाठी देशातील दोन सहकारी संस्थेने श्रीलंकेबरोबर सामंजस्य करार केला आहे.
देशात पहिल्यांदाच दिल्लीमधील प्रगती मैदानात आंतरराष्ट्रीय सहकारी व्यापारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात श्रीलंका आणि सहकारी संस्थांत दोन करार करण्यात आले आहेत.
श्रीलंकेने भारताकडून दूध खरेदी करण्यासाठी रस दाखविल्याचे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. श्रीलंकेबरोबर तीन सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामधील एक करार तामिळनाडू दूध सहकारी संस्था फेडरशेनच्या ब्रँडचा आहे. तर दुसरा करार पाँडेचरी दूध सहकारी फेडरेशनचा पोनलैट या ब्रँडचा आहे. फर्टिलायझर कंपनी इंडियन पोटॅशने श्रीलंकेबरोबर दूध पुरवठ्यासाठी स्वतंत्र करार केला आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. भारतात एकूण ७ कोटी दूध उत्पादक आहेत. चालू वर्षात दूधाचे उत्पादन १७५ अब्ज लिटर होईल, अशी अपेक्षा आहे. हे प्रमाण दूध उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या दुप्पट ठरणार आहे.