नवी दिल्ली - गोपनीयतेमुळे व काळ्या पैशामुळे चर्चेत राहिलेल्या स्विस बँकेतील भारतीयांची माहिती आजपासून सरकारला मिळणार आहे. भारत- स्विसत्झर्लंड सरकार स्वयंचलित प्रक्रियेतून माहितीची देवाण-घेवाण करणार आहेत.
स्विस बँकेतील भारतीय खात्यांची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला (सीबीडीटी) मिळणार आहे. केंद्र सरकारच्या काळ्या पैशाविरोधातील मोहिमेचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. केंद्र सरकारला २०१८ मधील स्विस बँकेतील सर्व भारतीयांच्या खात्यांची माहिती मिळणार असल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे. यामध्ये २०१८ मध्ये बंद करण्यात आलेल्या बँक खात्यांचाही समावेश आहे.
दोन्ही देशातील अधिकाऱ्यांची द्विपक्षीय चर्चा झाली. यामध्ये विशेषत : भारताने कर चुकवेगिरीच्या प्रकरणातील माहितीचा समावेश आहे. कराची अंमलबजावणी करण्याबाबत संयुक्त भागीदारी करण्यासाठी दोन्ही देशामधील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीला स्विसचे इंटरनॅशनल फायनान्सचे निकोलस मॅरिओ लुशर, महसूल सचिव ए.बी.पांडे, सीबीडीटीचे चेअरमन पी.सी.मोदी आणि सीबीडीटीचे सदस्य अखिलेश रंजन उपस्थित होते.