नवी दिल्ली – कोरोना महामारीत विस्कळीत झालेली पुरवठा साखळी आणि देशामधील घसरलेले उत्पादन यामधून भारतीय स्मार्टफोन बाजारपेठांबाहेर पडत आहे. स्मार्टफोनच्या बाजारपेठेत सुधारणा होत असल्याचे सकारात्मक चिन्हे दिसत आहेत. चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत स्मार्टफोन बाजारपेठ 40 टक्क्यांहून अधिक सावरेल, असे एका अहवालात म्हटले आहे.
मोबाईलची बाजारपेठ ही तिसऱ्या तिमाहीत सुधारणार असल्याचे सीएमआर कंपनीच्या अहवालात म्हटले आहे. या अहवालात भारतीय मोबाईल हँडसेटच्या बाजारपेठेचे अवलोकन करण्यात आले आहे. आगामी सणांदरम्यान स्मार्टफोन बाजारपेठेत सुधारणेची क्षमता असल्याचे अहवालात म्हटले आहे. सणांदरम्यान स्मार्टफोन कंपन्यांकडून ग्राहककेंद्रीत स्मार्टफोन दाखल होणार आहेत. तसेच 5ची तंत्रज्ञान असलेल्या स्मार्टफोनचे काही कंपन्या लाँचिग करणार असल्याचे सीएमआरने म्हटले आहे.
सीएमआरचे व्यवस्थापक अमित शर्मा म्हणाले, की कोरोना महामारीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत स्मार्टफोन बाजारपेठेचे नुकसान झाले आहे. या कालावधीत मोबाईल हँडसेट उद्योग हा पुरवठा आणि मागणीसह अनेक आव्हानांना सामोरे गेला आहे. मात्र, येत्या काही महिन्यात मोबाईल हँडसेट सावरेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. टाळेबंदी खुली होताना ग्राहकांकडून स्मार्टफोनची ऑनलाइन मागणी वाढल्याचेही त्यांनी सांगितले.