नवी दिल्ली – देशाची संरचनात्मक अर्थव्यावस्था बळकट आहे. अशा स्थितीत भारतीय उद्योगांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केले. ते भारतीय औद्योगिक महासंघाच्या (सीआयआय) वेबिनारमध्ये बोलत होते.
अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, की केंद्र सरकारने गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत आर्थिक सुधारणा व कॉर्पोरेट करातील बदल असे निर्णय घेतले आहेत. देशातील कंपन्यांनी गुंतवणूक वाढविली तर विदेशातील कंपन्यांचा गुंतवणूक वाढविण्याकरता विश्वास वाढेल, असे ठाकूर यांनी सांगितले. काही देशांमध्ये कॉर्पोरेट कर कमी असल्याचे आपण नेहमी बोलत होतो. गेल्या वर्षी आम्ही कॉर्पोरट करात कपात केली आहे. ऐतिहासिक निर्णय घेत कॉर्पोरेट कर 30 टक्क्यांहून 15 टक्के करण्यात आला आहे.
आता, भारतीय उद्योगांनी जगाला दाखविण्याची वेळ आली आहे. त्यांनी पुढे येवून गुंतवणूक करावी. प्रथम आपल्या घरामधून भारतीय उद्योगांकडून गुंतवणूक होण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी काल सायंकाळी भारतात गुंतवणूक करण्याचे लोकांना आवाहन केले. अर्थव्यवस्थेत परिवर्तन करणे हा मोदी सरकारचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.