नवी दिल्ली- देशात ५ जी सुरू करण्यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे. असे असले तरी मोबाईल आणि ब्राँडबँड या दोन्ही इंटरनेटच्या वेगात ३ क्रमांकाने घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा अहवाल वूकला या संस्थेने प्रसिद्ध केला आहे.
ब्रॉडब्रँड आणि मोबाईल या दोन्ही इंटरनेटचा वेग कमी झाल्याचे दिसून आले आहे. जून महिन्यात मोबाईलमधील इंटरनेट डाऊनलोडचा वेग १०.८७ एमबीपीएस आहे. तर ब्रॉडब्रँड इंटरनेटचा वेग २९.०६ एमबीपीएस होता. तर मे महिन्यात मोबाईलचा ११.०२ एमबीपीएस तर ब्रॉडब्रँडचा ३०.०३ एमबीपीएस होता.
भारत हा मे महिन्यात ब्रॉडब्रँडच्या वेगात ७१ व्या तर मोबाईल इंटरनेटच्या वेगात १२३ व्या क्रमांकावर होता. ही माहिती वूकलाच्या 'स्पीड टेस्ट ग्लोबल इंडेक्स'मध्ये देण्यात आली आहे.
गतवर्षीच्या तुलनेतही इंटरनेटचा वेग कमी होत आहे. जूलै २०१८ मध्ये भारत मोबाईल इंटरनेटच्या वेगात १११ व्या क्रमांकावर तर ब्रॉडबँडच्या वेगात ५६ व्या क्रमांकावर होता.
देशाला चांगल्या नेटवर्कसाठी पायाभूत सुविधांची गरज-
वूकलाचे सरव्यवस्थापक तथा सहसंस्थापक डग सट्ल्स म्हणाले, चांगल्या दर्जाचे नेटवर्क तयार करण्यासाठी नेटवर्कच्या चांगल्या पायाभूत सुविधा असणे गरजेचे आहे. भौगोलिकदृष्ट्या विशाल आणि अधिक लोकसंख्या असलेल्या देशापैकी भारत हा देश आहे. मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर होत असताना विस्तृत नेटवर्कची देशाला गरज आहे. या आव्हानाबरोबर ४ जी व आगामी ५ जीसाठी नेटवर्कची कार्यक्षमता सुधारणे गरजेचे आहे.
दक्षिण कोरियामध्ये मोबाईल इंटरनेटचा सरासरी वेग ९०.०६ एमबीपीएस आहे. तर सिंगापूरमध्ये ब्रॉडबँडचा सर्वात अधिक, सरासरी १९५.८८ एमबीपीएस एवढा वेग आहे.
चीन मोबाईल इंटरनेटच्या वेगात ४४ व्या तर ब्रॉडबँडच्या वेगात २२ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान मोबाईल इंटरनेटच्या वेगात ११४ व्या तर ब्रॉडबँडच्या वेगात १५५ व्या क्रमांकावर आहे.