नवी दिल्ली - केंद्र सरकारने प्राप्तिकरदात्यांना दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 साठी प्राप्तिकर परताव्याचे विवरणपत्र भरण्याकरता केंद्र सरकारने 31 डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 30 नोव्हेंबर 2020 ही मुदत केंद्र सरकारने दिली होती.
ज्या प्राप्तिकरदात्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण आवश्यक आहे, त्यांच्यासाठी विवरणपत्र भरण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढविली आहे. अशा प्राप्तिकरदात्यांसाठी विवरणपत्र भरण्यासाठी 31 जानेवारी 2021 ही अंतिम मुदत आहे.
प्राप्तिकरदात्यांना अधिक वेळ मिळण्याकरता मुदतवाढ
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 या वर्षाकरता प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याकरता मे महिन्यात मुदत वाढवून ३१ जुलै केली होती. त्यानंतर कोरोना महामारीत प्राप्तिकरदात्यांना दिलासा देण्यासाठी पुन्हा ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले आहे. प्राप्तिकरदात्यांना अधिक वेळ मिळावा, यासाठी विवरण पत्र भरण्याची मुदतवाढ दिल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हटले आहे.
दरम्यान, टाळेबंदीच्या काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या फिरण्यावर अनेक बंधने लागू होती. त्यामुळे अनेक प्राप्तिकरदात्यांना ऑनलाईन विवरणपत्र भरताना अडचणी आल्या होत्या.