मुंबई - केंद्र सरकारने परवडणाऱ्या दरातील घरांसाठी विविध सवलती आणि योजना जाहीर केल्या आहेत, असे असले तरी गेल्या ४ वर्षांत परवडणाऱ्या दरातील घरांच्या किमती वाढल्या आहेत. देशामध्ये परवडणारी सर्वात कमी घरे मुंबईत आहेत, ही माहिती आरबीआयच्या सर्व्हेमधून समोर आली आहे.
हाऊस प्राईज टू इनकम (एचपीटीआय) म्हणजे घराच्या किमतीच्या तुलनेत वैयक्तिक उत्पन्न यांचे प्रमाण असते. या प्रमाणातही लक्षणीय वाढ मार्च २०१५ पासून झाली आहे. मार्च २०१५ मध्ये एचपीटीआय ५६.१ होता. तर मार्च २०१९ मध्ये एचपीटीआय ६१.५ टक्के झाल्याचे सर्व्हेत म्हटले आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीत घर घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. भुवनेश्वरमध्ये परवडणाऱ्या दरातील घरे देशात सर्वाधिक आहेत.
काय म्हटले आहे सर्व्हेमध्ये-
मेडियन लोन टू इनकम (एलटीआय ) म्हणजे एकूण उत्पन्नापैकी कर्जाचे प्रमाण असते. या एलटीआयचे प्रमाणदेखील वाढले आहे. मार्चमध्ये २०१५ मधील एलटीआय ३.० ने वाढून मार्च २०१९ मध्ये ३.४ झाला. मेडियन ईएमआय टू इन्कमचे (ईटीआय) म्हणजे उत्पनाच्या तुलनेतील कर्ज हप्ता असतो. या ईटीआयचे प्रमाण गेली २ वर्षे स्थिर राहिले. मात्र मुंबई, पुणे आणि अहमदाबादमध्ये इतर शहरांच्या तुलनेत ईटीआयचे प्रमाण वाढले आहे. एलटीव्ही म्हणजे गृहकर्जावरील देणारी जोखीम असते. या मेडियन लोन टू व्हॅल्यूचे (एलटीव्ही) प्रमाण ६७.७ टक्क्यांवरून ६९.६ वर गेले आहे.
या शहरात करण्यात आला सर्व्हे-
हा सर्व्हे मुंबई, चेन्नई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, पुणे, जयपूर, चंदीगड, अहमदाबाद, लखनौ, भोपाळ आणि भुवनेश्वरमध्ये करण्यात आला आहे.