बंगळुरू - सरकारी कंपनी असलेल्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्समधील २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. व्यवस्थापनाने वेतन वाढविण्यासह इतर मागण्या मंजूर कराव्या, अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.
एचएएलच्या ९ कामगार संघटनांचे महासचिव एस. चंद्रशेखर म्हणाले, मागण्यांबाबत व्यवस्थापनाशी बोलणी अयशस्वी ठरली आहे. संघटनेने १५ दिवसापूर्वी नोटीस दिल्याप्रमाणे आम्ही कामगार कायद्याप्रमाणे बेमुदत संपावर जात आहोत. आमच्या मागण्यांवर विचार करायला व्यवस्थापनाने नकार दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संपावर जाणे भाग पडत असल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले. सर्व कामगार आणि सदस्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केल्याचेही चंद्रशेखर यांनी सांगितले.
हेही वाचा-घाऊक बाजारपेठेतील महागाईत घसरण; सप्टेंबरमध्ये ०.३३ टक्क्यांची नोंद
देशभरातील ७ ठिकाणी सुरू होणारा संप टाळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे हिंदुस्थान एअरोनॉटिक्सच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. ५५ वर्षीय जुनी कंपनी असलेल्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्समध्ये २० हजार कर्मचारी आहेत. हे कर्मचारी बंगळुरू, हैदराबाद, लखनौ, नाशिक आणि ओडिशामधील कोरापुत येथील ५ उत्पादन प्रकल्पात काम करतात. तर देशातील इतर चार संशोधन आणि विकास केंद्रातही कर्मचारी काम करतात.
हेही वाचा-वित्तपुरवठा...! ८ दिवसात ८१ हजार कोटींचे कर्ज विविध मेळाव्यांतून वाटप
कंपनीच्या व्यवस्थापनाने श्रेणी-१ च्या कर्मचाऱ्यांना १० ते २० टक्क्यांची वेतनावाढ देवू केली आहे. तर विशेष श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सरसकट १९ टक्के वेतनवाढ देवू केली आहे. दरम्यान, हिंदुस्थान एअरोनॉटिक्सच्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ १ जानेवारी, २०१७ पासून प्रलंबित आहे.
हेही वाचा-जाणून घ्या, कोण आहेत अर्थशास्त्राचे नोबेल मिळविणारे अभिजित बॅनर्जी