हैदराबाद – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) व्होडाफोन आणि आयडियाला काही प्रिमियम प्लॅन अचानक बंद करण्याची सूचना केली आहे. या दोन्ही कंपन्यांकडून प्रिमियम प्लॅनमधून ग्राहकांकडून जादा शुल्क घेत वेगवान ४जी डाटा देण्यात येत आहे.
ट्रायने भारती एअरटेलला ‘एअरटेल प्लॅटिनियम’ आणि व्होडाफोनला रेडएक्स पोस्टपेड प्लॅन बंद करण्याविषयी पत्र लिहिले आहे. जादा शुल्काने ग्राहकांना वेगवान डाटा दिल्याने इतर ग्राहकांची सेवा विस्कळित होवू शकते, अशी ट्रायने पत्रातून चिंता व्यक्त केली आहे.
हा आहे एअरटेलचा प्रिमियम प्लॅन
गेल्या आठवड्यात भारती एअरटेलने प्रायोरिटी ४जी नेटवर्कची घोषणा केली. यामध्ये कंपनीने प्लॅटिनियम ग्राहकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान घेतले आहे. त्यामुळे ग्राहकांना वेगवान ४जी डाटा मिळणार आहे. जे ग्राहक मासिक 499 रुपये किंवा त्याहून अधिक पोस्टपेडचा प्लॅन घेत आहेत, त्यांना प्लॅटिनियमची सेवा एअरटेलकडून देण्यात येणार आहे.
हा आहे व्होडाफोनचा प्रिमियम प्लॅन
व्होडाफोन आयडियाकडून रेडएक्स प्रिमियम पोस्टपेड ही गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू केली आहे. यामध्ये मासिक 999 रुपयांहून अधिक प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना 50 टक्क्यांहून अधिक वेगवान ४जीची सेवा मिळणार असल्याचे व्होडाफोनने जाहीर केले आहे . या प्लॅनसाठी ग्राहकांना मेपासून मासिक 1,099 रुपये द्यावे लागत आहेत.
नेट न्यूट्रिलिटीचा वाद
नेट न्यूट्रिलीटीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांची सेवा बंद करणे, कमी करणे, त्यामध्ये ठरावीक कंटेन्टला प्राधान्य देणे यावर निर्बंध आहेत. याबाबत बोलताना दूरसंचार तज्ज्ञ डॉ. टी. एच. चौधरी म्हणाले, की दूरसंचार सेवेचा वेग वाढत आहे आणि वाढणार आहे. यापूर्वी ४जीमध्ये सुधारणा होवून ५जी येणार आहे. काही कंपन्यांकडून त्यासाठी दर आणि ऑफरही देण्यात येणार आहेत. त्यांना कोणीही थांबवू शकणार नाही. कंपन्यांना ट्रायने स्पर्धा करू द्यावी. ग्राहकांना त्यांचे पर्याय निवडू द्यावेत, अशी अपेक्षा चौधरी यांनी व्यक्त केली.