नवी दिल्ली - इंडियन ऑईल, भारत पेट्रोलिअम आणि हिंदूस्थान पेट्रोलिअम कंपनीने खाद्यान्न तेलापासून बायोडिझेल तयार करणारी योजना आज लाँच केली. ही योजना आज जागतिक जैवइंधन दिनीच सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे देशाला ११० कोटी लिटर बायोडिझेल मिळू शकेल, असा विश्वास केंद्रीय पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही योजना लाँच केली होती. त्यासाठी तीनही सरकारी कंपन्यांनी उत्सुकता दाखविली आहे. या कंपन्या खाद्यान्न तेलापासून बायोडिझेल तयार करण्यासाठी प्रकल्प सुरू करणार आहेत.
पहिल्या वर्षी सरकारी तेल कंपन्या खाद्यान्न तेलाला ५१ रुपये प्रति लिटर देणार आहेत. दुसऱ्या वर्षी ५२. ७ रुपये लिटर तर तिसऱ्या वर्षी ५४.५ रुपये प्रति लिटर देणार आहेत. खाद्यान्न तेल गोळा करण्यासाठी खास मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे. तसेच खाद्यान्न तेलाचा पुनर्वापर करण्यासाठी स्टीकरही लाँच करण्यात आले आहे. हे स्टीकर हॉटेल, रेस्टॉरंट आदी ठिकाणी बसविण्यात येणार आहे. त्याचा अर्थ तेथील खाद्यान्न हे बायोडिझेलसाठी वापरण्यात येणार आहे. याबाबात माहिती देताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले, वापरण्यात आलेले खाद्यान्न तेल हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आम्ही जैवइंधन दिन हा पर्यायी उर्जा म्हणून साजरा करणार आहोत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ८ कोटींचे उद्दिष्ट सप्टेंबरअखेर पूर्ण होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले, स्वच्छ उर्जा मोहिमेमुळे ह्रदयाच्या होणारे रोग २० टक्क्यांनी कमी झाले आहेत. इथेनॉलचा अतिरिक्त साठा करण्यात येणार आहे. उसाच्या मळीपासून इथेनॉल तयार करण्यात येत आहे.
देशामध्ये प्रत्येक महिन्याला ८५० कोटी लिटर वापरले जाते. त्यामध्ये ५ टक्के बायोडिझेल २०३० पर्यंत वापरण्याचे सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी दरवर्षी ५०० कोटी बायोडिझेलची गरज लागणार आहे. देशामध्ये २ हजार ७०० कोटी लिटर खाद्यान्न तेल वापरण्यात येते. त्यामधील १४० कोटी खाद्यान्न तेलाचा पुनर्वापर करणे शक्य आहे. हे खाद्यान्न तेले हॉटेल, रेस्टोरंट आणि कँटीनमधून गोळा करण्यात येणार आहे. त्यामुळे देशाला ११० कोटी लिटर बायोडिझेल मिळू शकणार आहे. खाद्यान्ना तेलाच्या पुनर्वापरासाठी देशामध्ये शृखंला नाही. त्यासाठी खूप संधी आहे.
खाद्यान्न तेलाचा पुनर्वापर हा बायोडिझेलसाठी करण्याची गरज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनीही अधोरेखित केली. वापरलेले खाद्यान्न पुन्हा खाण्यासाठी वापरल्याने रक्तदाब, यकृताचे रोग होवू शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.