नवी दिल्ली - प्रवास करण्यासाठी अनेकजण गुगल मॅपचा वापर करतात. या गुगल मॅपमधून लवकरच प्रवाशांना कोणत्या मार्गाने आणि वाहनाने प्रवास करणे सुलभ होणार याची माहिती मिळू शकणार आहे.
गुगल मॅपवर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय असणार आहे. त्यामध्ये ऑटोरिक्षा आणि सार्वजनिक वाहतुकीचा समावेश असणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना किती वेळ लागणार आहे, हे कळू शकणार आहे. तसेच कोणत्या ठिकाणावरून ऑटोरिक्षा मिळू शकेल, हेदेखील सूचित करण्यात येणार आहे. सध्या, ही सुविधा केवळ दिल्ली आणि बंगळुरू शहरामध्ये असल्याचे गुगलचे उपाध्यक्ष जेन फिट्झपॅट्रिक यांनी सांगितले. गुगल मॅपला १५ वर्षे झाल्यानिमित्त त्या बोलत होत्या.
गुगल मॅपमध्ये १४ विशेष सुविधा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामधील आठ सुविधा सुरुवातीला केवळ भारतात उपलब्ध करून दिल्या आहेत. तर ६ सुविधा भारतानंतर जगभरात सुरू करण्यात आल्या आहेत. तर स्वच्छ भारतच्या प्रेरणेतून सार्वजनिक शौचालयांची गुगल मॅपमध्ये माहिती देण्यात आली आहे. दरम्यान गुगल मॅपला १५ वर्षे पूर्ण झाल्याने गुगलचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.