नवी दिल्ली - गुगल पेचे दर महिन्याला देशात ५ कोटी ५० लाख वापरकर्ते आहेत. गुगल पे हे देशातील लहान आणि मध्यम व्यावसायिकांसह किराणा स्टोअर्सला जोडणार आहे. यामधून व्यापाऱ्यांसह ग्राहकांना डिजीटल सुरक्षित पर्याय देण्यासाठी गुगलकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
युनायटेड पेमेंट्स इंटरफेसचा (यूपीआय) उपयोग जवळील किराणा स्टोअर शोधण्यासाठी होतो. किराणा स्टोअर्स या पद्धतीने जोडण्यात येणार असल्याचे गुगल पेचे संचालक अंबरिश केंघे यांनी सांगितले. ते म्हणाले, की देशातील ९० टक्के किरकोळ बाजारपेठ ही असंघटित आहे. येत्या काही वर्षात हे क्षेत्र डिजीटल होणार आहे. त्यामुळे डिजीटल पेमेंट्स कंपन्यांना चांगली संधी मिळणार आहे.
सध्या गुगल पेला झोमॅटो, बुक मायशोसह ३ हजार ऑनलाईन व्यापारी (मर्चंट्स) जोडलेले आहेत. तर देशातील ३ हजार ५०० शहर आणि गावामध्ये २ लाख ऑफलाईन स्टोअर्स आहेत.
स्मार्टफोनचा वापर वाढत असल्याने गेल्या दोन-तीन वर्षात डिजीटल पेमेंटचे प्रमाण वाढल्याचे केंघे यांनी सांगितले. पैसे हे अतिसंवदेनशील मालमत्ता आहे. त्या मालमत्तेबाबत वापरकर्ते ही गुगल पेवर विश्वास ठेवत आहे. त्यामुळे त्यांचा विश्वास ही आमची जबाबदारी असल्याची जाणीव आहे, असेही ते म्हणाले.