नवी दिल्ली - तुम्ही जर ओला किंवा उबेरने मध्यरात्री प्रवास करणार असेल तर गुगल मॅप तुमच्या सुरक्षेची काळजी घेणार आहे. जर कॅब चालकाने नियोजित दिशेत ५०० मीटरचा बदल केला तर गुगल मॅप तुम्हाला नोटिफेकेशन देणार आहे. त्यानंतर प्रवाशाला संबंधित कॅब कंपनी, जवळचे व्यक्ती किंवा पोलिसांशी संपर्क साधणे शक्य होणार आहे.
गुगल मॅपने 'स्टे सेफर' नावाने भारतीयांसाठी खास फीचर दिले आहे. या फीचरची सुविधा अँड्राईड वापरकर्त्यांना सार्वजनिक वाहने आणि रिक्षासाठीदेखील घेता येणार आहे. गुगल मॅपने नोटिफेकेशन दिल्यास वापरकर्त्यांना मूळ मार्गाशी बदललेल्या मार्गाची तुलना करता येणार आहे.
आम्ही संशोधन केले असता खूप लोक प्रवासाच्या सुरक्षेबाबत चिंतित असल्याची बाब दिसून आली. हा प्रश्न सोडविण्यासाठी भारतात आम्ही गुगल मॅपमध्ये फीचर दिल्याचे गुगल मॅपचे उत्पादन व्यवस्थापक अमँडा बिशॉप यांनी सांगितले.
गुगल मॅपच्या सहाय्याने असे राहता येईल सुरक्षित-
- जेव्हा तुम्ही गुगल मॅपवर इच्छितस्थळाचा पर्याय निवडता आणि दिशा निवडता तेव्हा स्टे सेफरचा पर्याय निवडा. त्यानंतर गेट ऑफ रुट अलर्टचा पर्याय निवडा.
- यामध्ये निवडलेला प्रवास मार्ग हा वापरकर्त्याला मित्र आणि कुटुंबासमेवत थेट शेअर करता येणार आहे. त्यामुळे वापकर्त्याच्या प्रवासाची सर्व माहिती त्याच्या मित्र व नातेवाईकांना कळू शकणार आहे.
याशिवाय गुगल मॅपच्या या आहेत सुविधा
- रेल्वे सध्या कुठे आहे याची सद्यस्थिती (लाईव्ह)
- देशातील सर्वात मोठ्या शहरातील बसच्या वेळा आणि सद्यस्थितीमधील वाहतूक
- रेल्वेच्या तुलनेत ऑटोरिक्षासह सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय