नवी दिल्ली - केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिगटाची महत्त्वपूर्ण बैठक आज बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक आज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.
केंद्रीय मंत्रिगट सुमारे २१ लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजचा आढावा घेण्याची शक्यता आहे. हे पॅकेज निर्मला सीतारामन यांनी सलग पाच दिवसांच्या पत्रकार परिषदेमधून जाहीर केले आहे.
हेही वाचा-शेअर बाजार खुला होताना ८०० अंशांनी घसरण; 'या' कंपन्यांचे घसरले सर्वाधिक शेअर
एमएसएमई क्षेत्र, कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा यावर आर्थिक पॅकेजमध्ये भर देण्यात आला आहे. केंद्र सरकारने कोळसा, खनिज, संरक्षण उत्पादन, हवाई वाहतूक क्षेत्र, विमानतळ आदी क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या सुधारणा जाहीर केल्या आहेत.
हेही वाचा-ई-कॉमर्स कंपन्यांना बिगर जीवनावश्यक वस्तू रेडझोनमध्येही घरपोहोच देण्याची परवानगी
आर्थिक पॅकेजचा गरजू आणि संकटात असलेल्या घटकांसाठी कसा फायदा पोहोचविता येईल, यावर केंद्रीय मंत्रिगट चर्चा करण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे ५२ दिवसांहून अधिक काळ टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेसह विविध क्षेत्रांवर झाल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे.