नवी दिल्ली - मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचे सावट धनत्रयोदशीला होणाऱ्या सोने खरेदीवर दिसून आले आहे. वाढत्या किंमती आणि कमी मागणीने सोने आणि चांदीच्या खरेदीत सुमारे ४० टक्के घसरण झाली आहे.
दरवर्षी ग्राहकांकडून धनत्रयोदशीला सोने व चांदीची खरेदी मोठ्य़ा प्रमाणात होते. मात्र, यंदा देशभरातील सराफा बाजारपेठेत सोन्याच्या खरेदीचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे. धनत्रयोदशीमुळे आज सोन्याचे दर आज प्रति तोळ्याला २२० रुपयांनी वाढून ३९,२४० रुपये झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत आज सोन्याचे दर २० टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी सोने प्रति तोळा हे ३२ हजार ६९० रुपये होते.
अखिल भारतीय व्यापारी संघटनेच्या (सीएआयटी) माहितीनुसार आज सायंकाळपर्यंत २ हजार ५०० कोटी रुपयांचे ६ हजार किलो सोन्याची विक्री होण्याची शक्यता आहे. गतवर्षी धनत्रयोदशीला ५ हजार ५०० कोटी रुपयांचे १७ हजार किलो सोन्याची विक्री झाली होती.
हेही वाचा-दिवाळीनिमित्त बाजारात आले वाजवण्याचे नव्हे खाण्याचे फटाके!
अंदाजित आकडेवारीनुसार यंदा व्यवसायात सुमारे ३५ ते ४० टक्के घसरण झाल्याचा अंदाज सीएआयटीच्या गोल्ड आणि ज्वेलरी समितीचे चेअरमन पंकज अरोरा यांनी व्यक्त केला. सोने आणि चांदी महागल्याने ग्राहकांकडून मागणी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. ही गेल्या दहा वर्षात सर्वात निराशाजनक धनत्रयोदशी असल्याचेही त्यांनी सांगितले.