नवी दिल्ली - धनत्रयोदशीनिमित्त सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे ग्राहकांकडून आज सोन्याची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून राजधानीत सोन्याची किंमत प्रति तोळा 220 रुपयांनी वाढून 39 हजार 240 रुपये झाली आहे. ही माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजने दिली आहे.
सोने हे गुरुवारी प्रति तोळा 39,020 रुपये होते. चांदीचा भाव आज प्रति किलो 670 रुपयांनी वाढून 47,680 रुपये झाला. धनत्रयोदिशीच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून सोन्याची आवर्जून खरेदी केली जाते. याच कारणाने दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 220 रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजच्या कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा-ईडी व कंपनी व्यवहार मंत्रालयातील मतभेद सोडविण्याकरिता केंद्रीय अर्थमंत्र्यांचे प्रयत्न
धनत्रयोदिशी ही उत्तर भारत आणि पश्चिम महाराष्ट्रात उत्साहात साजरी केली जाते. सणासुदीचे दिवस आणि आगामी सणाच्या मुहुर्तावर ग्राहकांकडून सोन्याची व चांदीची मागणी वाढेल, अशी अपेक्षा पटेल यांनी व्यक्त केली. जागतिक अस्थिरतेने जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या किमती वाढल्याचेही त्यांनी सांगितले.