नवीन दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून स्टील आणि सिमेंटच्या किमती वाढत आहेत. अशा स्थितीत स्टील आणि सिमेंटला पर्याय ठरेल, असे संशोधन होण्याची गरज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते दीनदयाळ उपाध्याय विज्ञान ग्रामसंकुलच्या कार्यक्रमात बोलत होते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सिमेंट आणि स्टीलला पर्याय ठरू शकणाऱ्या गोष्टींवर संशोधन करावे, असे आयआयटीमधील काही लोकांना सांगण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांत स्टीलच्या किमती ६५ टक्क्क्यांनी वाढल्या आहेत. जर स्टील आणि सिमेंटला पर्याय निर्माण झाला तर, किमती कमी होणे शक्य होईल, असे मत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी सोयाबीन केकची काही उत्पादने पाहिली. त्याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात वापर केला तर कुपोषण निर्मूलन होणे शक्य आहे. सोयाबीन केकमध्ये ४९ टक्के प्रथिने असल्याने मटनाला स्वस्तामध्ये पर्याय उपलब्ध होऊ शकतो. चिकन आणि मटन आपली मनोस्थिती बिघडिवत आहेत. मात्र, आपण शाकाहरी असलो तरी देशात खूपजण हे मांसाहारी आहेत. त्यामुळे हा वादाचा विषय होऊ नये, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
हेही वाचा-जुन्या १०० रुपयांच्या नोटा बंद होणार नाहीत: आरबीआयचा खुलासा
ग्रामोद्योगाला चालना दिल्यास लाखो रोजगाराची निर्मिती होऊ शकतो. त्यामधून ५ लाख कोटींची उलाढाल होऊ शकते. येत्या ५ वर्षात एमएसएमई क्षेत्र हे योगदान हे ३० टक्क्यांवरून ४० टक्के होऊ शकते, असा विश्वास केंद्रीय वाहतूक मंत्र्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-टीसीएसने रिलायन्सला टाकले मागे; ठरली सर्वाधिक भांडवली मुल्याची कंपपनी