नवी दिल्ली - कोणत्याही सार्वजनिक बँकांकडून सेवा शुल्क वाढविण्यात आलेले नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिले आहे. बँक ऑफ बडोदाने खात्यावर पैसे जमा करण्यासाठीच्या नियमातील बदल मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
बँक ऑफ बडोदाच्या खात्यावर महिनाभरात पाच वेळा पैसे काढणे व जमा करण्यासाठी विनाशुल्क सेवा देण्यात येत होती. त्यामध्ये बँक ऑफ बडोदाने बदल करून १ नोव्हेंबर २०२० पासून तीन वेळा पैसे काढणे व जमा करण्यासाठी विनाशुल्क सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता बँक ऑफ बडोदाने निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसऱ्या कोणत्याही सार्वजनिक बँकेने शुल्कात बदल केला नसल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. असे असले तरी सार्वजनिक बँका व इतर सर्व बँकांना योग्य, पारदर्शीपणाने व भेदभावरहित सेवावर शुल्क आकारण्याची परवानगी आहे.