मुंबई - भारतीय लोक बचतीच्या सवयीमुळे जगभरात ओळखले जातात. मात्र, पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी भारतीयांची आर्थिक सवय बदलत असल्याचे दिसून येत आहे. भारतीयांच्या कौटुंबिक आर्थिक बचतीमध्ये २०१७-१८ पासून घसरण होत असल्याचे आरबीआयच्या अहवालामध्ये म्हटले आहे.
देशातील एकूण ठेवी आणि चलनाचे निम्मे प्रमाण हे कौटुंबिक बचतीमध्ये (फायनान्शियल सरप्लस ऑफ इंडियन हाउसहोल्डिंग) आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षापासून कौटुंबिक बचतीची जागा शेअर आणि रोख्यांनी घेतली आहे. कौटुंबिक मालमत्तेमध्ये विमा आणि पेन्शन फंडचा हिस्सा वरचेवर वाढत आहे. यातून जोखीम घेण्याची वाढलेली वृत्ती दिसून येत आहे. कौटुंबिक बचतींवर कर्ज आणि उधारी देण्याचे उत्तरदायित्व (लायबिलिटी) आहे. कौटुंबिक बचती या बहुतांश वित्तीय संस्थांशी जोडल्याचे अहवालामधून दिसून आले आहे.
नोटाबंदीचाही कौटुंबिक बचतीवर परिणाम झाल्याचे २०१६-१७ मध्ये दिसून आले. त्यामुळे ही बचत इतर स्वरुपात ठेवण्यावर भर दिसून आल्याचे आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे.