बंगळुरू- कोरोना महामारीच्या संकटातून बाजारपेठ सावरत असल्याचे चित्र समोर आले आहे. सणासुदीत १५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन विक्रीत गतर्षीच्या तुलनेत ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू वर्षात २ लाख ९० हजार कोटी रुपयांच्या वस्तुंची विक्री झाली आहे. याबाबतची माहिती रेडसीरच्या सर्वेक्षणात दिसून आली आहे.
भारतीय ग्राहकांमधून ऑनलाईन खरेदीचे प्रमाण प्रमाण वाढत आहे. मोठ्या प्रमाणात सवलती आणि अनेक पर्याय असल्याने ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढल्याचे रेडसीरने म्हटले आहे. भारतीय ई-कॉमर्सच्या भविष्यासाठी हे खरेदी महोत्सव पायाभरणी करणार असल्याचे रेडसीर कन्सल्टिंगचे संचालक मृग्यांक गुटगुटीया यांनी म्हटले आहे.
स्मार्टफोनच्या विक्रीत ४७ टक्के वाढ
रेडसीरच्या अहवालानुसार स्मार्टफोनच्या एकूण विक्रीतील ४७ टक्के विक्री ही नवीन आणि परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोनची आहे. रेडसीरच्या अहवालानुसार सणादरम्यान स्मार्टफोनच्या विक्रीत ४७ टक्के वाढ झाली आहे. ग्राहकांना डिलिव्हरीचे मिळणारे पर्याय, परवडणाऱ्या दरातील स्मार्टफोनचे मॉडेल यामुळे ऑनलाईन विक्री वाढल्याचे रेडसीर कन्सल्टिंगने म्हटले आहे.
दरम्यान, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा ऑनलाईन विक्रीत ९० टक्के हिस्सा असल्याचे रेडसीरने म्हटले आहे.