श्रीनगर - केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील दूरसंचार सेवा सुरळित केल्याचा दावा आहे. असे असले तरी खरेदीदारांशी संपर्क होत नसल्याने येथील सूक्ष्म, लघू आणि मध्यम (एमएसएमईज) संकटात सापडला आहे. त्यामुळे येथील उद्योजकांना कारखाने बंद करण्याची वेळ आली आहे.
उत्पादित केलेला माल विक्रीअभावी तसाच पडून राहत नसल्याचे उद्योगांचे भांडवल अडकून पडले आहे. अशी परिस्थिती आल्याने जम्मू आणि काश्मीरमधील अनेक कारखान्यांवर उद्योग बंद करण्याची वेळ आली आहे. सफरचंदांसह इतर मालाची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी चेंबर्स ऑफ ट्रेडर्स फेडरेशनने गुरुवारी केली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पोटापाण्यासाठी इतर राज्यातून आलेल्या कामगारांनाही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यापासून स्थलांतरित कामगारांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधणे शक्य झाले नाही.
बिहारचा रहिवाशी असलेला राहुल (२१) म्हणाला, मी सफरचंदाच्या कारखान्यात काम करतो. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतर अनेक कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. दुसरा मजूर सतिश कुमार हा बिहारचा रहिवासी आहे. तो म्हणाला, माझा कुटुंबाशी ५ ऑगस्टपासून संपर्क होत नाही. मला माहित आहे, ते छान आहेत. मात्र, माझ्याविषयी त्यांना माहित नाही. अनेक कामगारांनी काश्मीरच्या खोऱ्यातून काढता पाय घेतला आहे. आम्हीदेखील लवकरात लवकर येथून निघून जाणार आहोत.