मुंबई - जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता यांना देश सोडण्यापासून तपास अधिकाऱ्यांनी रोखले आहे. हे दोघेही मुंबई विमानतळावरून एमिरेट्सच्या विमानाने मुंबईहून दुबई येथे जाण्याच्या तयारीत होते.
नरेश गोयल व त्यांची पत्नी अनिता हे प्रवास करत असलेले विमान उड्डाण करण्याच्या तयारीत होते. यावेळी अधिकाऱ्यांनी विमान उड्डाण थांबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. नरेश गोयल यांच्या विरोधात लूक आउट नोटीस निघाल्याने त्यांना देश सोडण्यावर बंदी होती. गोयल दाम्पत्य हे मुंबई विमानतळावरून दुपारी 3 वाजून 35 मिनिटांच्या बोईंग 777 च्या विमानाने दुबईला जाणार होते.
नरेश गोयल यांच्या जेट एअरवेज कंपनीने सरकारी बँकांचे कोट्यवधी रुपये थकविले आहेत. त्यामुळे कंपनीची सेवा बंद असल्याने हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.