नवी दिल्ली - केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. सरकारच्या सर्व मंत्रालय आणि विभागातील कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याची सक्ती हवी, असे गडकरी यांनी म्हटले आहे. ते 'गो इलेक्ट्रिक कॅम्पेन'च्या लाँचिंगमध्ये बोलत होते.
सरकारने घरगुती गॅसला अनुदान देण्याऐवजी इलेक्ट्रिक घरगुती उपकरणांच्या खरेदीवर सरकारने अनुदान द्यावे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचविले आहे. आपण इलेक्ट्रिक घरगुती उपकरणाला का अनुदान देत नाही? असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. पुढे ते म्हणाले की, घरगुती इलेक्ट्रिक उपकरणे ही पर्यावरणस्नेही आहेत. त्यांच्यामुळे गॅसच्या आयातीवरील खर्च कमी होऊ शकणार आहे.
हेही वाचा-इंधन दरवाढीचा उच्चांक: दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९०.१० रुपये
केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंह यांनी त्यांच्या विभागातील सर्व सरकारी अधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे बंधनकारक करायला पाहिजे. ते त्यांच्या विभागात तसे करू शकतात. दिल्लीत १० हजार इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्यास महिन्याला ३० कोटी रुपये वाचू शकतात. फ्लूसेल बस सेवा ही दिल्ली ते आग्रा आणि दिल्ली ते जयपूर लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा यावेळी केंद्रीय उर्जामंत्र्यांनी केली.
हेही वाचा-अॅमेझॉनच्या ई-कॉमर्स पोर्टलवर बंदी आणावी-सीएआयटीची मागणी
दरम्यान, केंद्र सरकारने देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहनांचेही कार्यालयही बंगळुरूमध्ये सुरू करण्यात आले आहे.