नवी दिल्ली – काँग्रेसचे चाणक्य मानले जाणारे नेते अहमद पटेल अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अहमद पटेल यांची दिल्लीतील निवासस्थानी चौकशी केली. मनी लाँड्रिंग प्रकरणातील संदेसरा ब्रदर्सशी काय संबंध आहे, याबाबत ईडीकडून पटेलांना प्रश्न विचारण्यात आले.
ईडीच्या तीन सदस्यांचे पथक सेंट्रल दिल्लीमधील 23, मदर तेरेसा क्रेसेंट या अहमद पटेलांच्या घरी पोहोचले होते. त्यांनी मनी लाँड्रिगच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे अहमद पटेलांचा जबाब घेतला आहे. यापूर्वी ईडीने दोनवेळा पटेलांना समन्स बजावले होते. मात्र पटेल हे गुजरातचे खासदार असून ज्येष्ठ नागरिक असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना घराबाहेर पडणे शक्य नव्हते. तशी पटेलांनी केलेली विनंती ईडीने मान्य केली. मात्र, चौकशी करण्यासाठी घरी तपास अधिकारी पाठवू, असे ईडीने पटेल यांना सांगितले होते.
गुजरातच्या स्टर्लिंग बायोटेक कंपनीकडून कोट्यवधी रुपयांची बँकांची फसवणूक व मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात चेतन आणि नितीन संदेसरा बंधू आणि इतरांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी अहमद पटेलांचा संबंध असल्याचा ईडीला संशय आहे.