मुंबई - पीएमसी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी सारंग वाधवान व राकेश वाधवान यांची ई़डीने चौकशी केली. या चौकशीदरम्यान वाधवान पिता-पुत्राच्या १५ नवीन मालमत्तेची माहिती उघडकीस आली. ही माहिती ईडीने मंगळवारी न्यायालयाला दिली आहे.
कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान वाधवा पिता-पुत्राच्या १५ नवीन मालमत्तेची माहिती ईडीला मिळाली आहे. या नवीन मालमत्तेची खरेदी किंवा विक्री पीएमसी बँकेकडून मिळालेल्या कर्जातून केल्याचा ईडीला संशय आहे.
सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वाधवान पिता-पुत्राला मंगळवारी न्यायालयात हजर केले. या दोन्ही आरोपींना २४ ऑक्टोबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी बेकायदेशीर अर्थव्यवहार (मनी लॉन्ड्रिंग) झाल्याबाबत तपास करण्यासाठी आरोपींच्या कोठडीची ईडीकडून मागणी करण्यात आली होती.