हैदराबाद - कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिननंतर देशाला लवकरच तिसरी कोरोना लस मिळण्याची चिन्हे आहेत. डॉ. रेड्डीज लॅबोरटरीज लि. कंपनीने रशियाची स्पूटनिक व्ही ही कोरोना लस भारतात मार्चमध्ये लाँच करणार असल्याचे म्हटले आहे. ही लस आपत्कालीन स्थिती वापरासाठी मंजुरी मिळेल, अशी आशा डॉ. रेड्डीज लॅबने व्यक्त केली आहे. ही माहिती त्यांनी व्हिडिओ पत्रकार परिषदेत दिली आहे.
स्पूटनिक व्ही या कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्याची चाचणी पुढील महिन्यात पूर्ण होईल, अशी डॉ. रेड्डीजला अपेक्षा आहे. डॉ. रेड्डीज लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सॅप्रा म्हणाले की, ७० टक्के चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. पुढील महिन्यात लसीकरण सुरू होईल, अशी आशा आहे.
फेब्रुवारीमध्ये तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही आकडेवारी डीसीजीआयला देण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-अर्थसंकल्पाच्या अंदाजाहून वित्तीय तुटीत १४५.८ टक्क्यांची वाढ
स्पूटनिक लसीच्या उत्पादनासाठी स्थानिक उत्पादकांशी चर्चा सुरू आहे. लशीची किंमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. सरकारसह खासगी क्षेत्राला गरजेप्रमाणे लशीचा पुरवठा करण्याचे कंपनीने नियोजन केले आहे. डॉ. रेड्डीजने सप्टेंबर २०२० मध्ये रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीतून स्पूटनिक व्हीची चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच लशीच्या वितरणाचे भारतामधील हक्क डॉ. रेड्डीजला मिळणार आहेत.
हेही वाचा-आर्थिक सर्वेक्षणात केवळ सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक - पी. चिदंबरम