वॉशिंग्टन - ओरॅकल आणि चीनची कंपनी टिकटॉक यांच्यामधील सौद्यावर लक्ष असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनच्या मालकीचे असलेल्या टिकटॉकमुळे देशाच्या सुरक्षेला कोणताही धोका होवू नये, याची सौद्यापूर्वी खात्री व्हावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. ते व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलत होते.
ट्रम्प यांनी कार्यकारी आदेश काढून टिकटॉक आणि वूईचॅटवर निर्बंध लागू केले आहेत. जर या दोन्ही कंपन्यांनी १५ सप्टेंबरमध्ये त्यांचा व्यवसाय अमेरिकेतील कंपन्यांना विकला नाही तर त्यांना अमेरिकेत व्यवसाय करता येणार नाही. सुरुवातीला टिकटॉकचा हिस्सा घेण्यासाठी मायक्रोसॉफ्टने बाईटडान्सबरोबर चर्चा केली. मात्र, ही चर्चा फिस्कटल्यानंतर बाईटडान्सने ओरॅकलबरोबर सौद्यासाठी चर्चा सुरू केली आहे. याबाबत व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, की टिकटॉकने अमेरिकेच्या कंपनीबरोबर व्यवहार केल्यास त्यातील मोठा निधी अमेरिकेच्या राजकोशात जमा होणे आवश्यक आहे. मला दोन्ही कंपन्यांचे सौदे पाहायचे आहेत. चीन काय करत आहे, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे सुरक्षेची विशेष गरज आहे. टिकटॉकच्या सौद्यातून मिळणारा निधी राजकोषात जमा करण्यावर कायदेशीर आव्हाने आहेत. मात्र, आम्ही त्यांना येथील पैसा घेऊन जाऊ देणार नाही.
हेही वाचा-'टिकटॉक विकत घेण्याच्या शर्यतीत गुगल नाही'
अमेरिकेच्या प्रशासनामुळेच हा सौदा होणे शक्य होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ओरॅकलबरोबरील सौद्यामध्ये बाईटडान्सचा मोठा हिस्सा असणे आवडणार नसल्याचेही ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हणाले.
हेही वाचा-टिकटॉकच्या खरेदीचा फिस्कटला सौदा; मायक्रोसॉफ्ट नव्हे 'ही' कंपनी आहे शर्यतीत