नवी दिल्ली - विकास, सुधारणा आणि प्रक्रिया ही काळाची गरज असल्याचे मत माजी केंद्रीय वाणिज्य मंत्री, खासदार सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. ते आयएमपीएआर फोरमच्या सदस्यांची ऑनलाईन बोलत होते.
आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान हे सुरेश प्रभूंशी बोलताना म्हणाले, की काही दृष्टीकोन आणि अंशत: वस्तुस्थितीमुळे संशय आणि अविश्वासाचे वातावरण आहे. यावर प्रभू म्हणाले, देशातील 17 टक्के लोक जर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत सहभागी झाले नाही, तर देशाचा विकास होणार नाही. तर अविश्वास आणि संशय बाजूला ठेवून मुख्य आर्थिक प्रवाहात सामील व्हावे. संमिश्र शालेय शिक्षण, धार्मिक भेदभाव न करता आर्थिक संधी मिळण्यासाठी पद्धतींचा वापर आणि विश्वास निर्माण करणे अशा धोरणांवर विचार करण्याची गरज आहे.
दोनशे वर्षांपूर्वी भारत हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश होता. त्यावेळी औद्योगिक प्रगती नसतानाही केवळ कारागिरांमुळे प्रगती होवू शकल्याचे प्रभू यांनी सांगितले. तेव्हा कारागिरांमुळे देशाला समृद्धी मिळाली होती, असे त्यांनी मत व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले आत्मनिर्भर भारत अभियान हे सर्वांसाठी आहे. त्यामधून सर्व कारागीरांची प्रगती होवू शकते. कारागिर देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका पार पडू शकतात, असे प्रभू यांनी म्हटले.